रत्नागिरी- नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असणारी रत्नागिरी नगर परिषद आता पुन्हा एकदा स्मशानभूमीच्या कामातील भ्रष्टाचारामुळे चर्चेत आली आहे. स्मशानभूमिच्या बांधकामात ३५ लाखांहून रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनीच चौकशीचे आदेश दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळे रत्नागिरी महापालिका चर्चेत आली आहे. मिरकरवाडा स्मशानभूमीच्या नुतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम ४७ लाखांचे असताना ठेकेदाराने ४९ लाखाचे काम पूर्ण केल्याचे पत्र दिले आहे. परंतु, प्रत्यक्षात १० लाखाचेही काम झाले नसल्याचा आरोप नगरसेवक समीर तिवरेकर यांनी थेट पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला.
या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासाठी १ लाख ३६ हजारांचे अंदाजपत्रक होते. मात्र, हे काम वाढून तब्बल ११ लाख ९२ हजारावर गेले. मात्र, १० लाख वाढीव देण्याचे अधिकार कोणाला? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. स्मशानभूमीत स्टोअर रूमही झालेली नसल्याचा दावा नगरसेवक सुशांत चवंडे यांनी केला. केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठीच अंदाजपत्रकात बदल करून कामाचा समावेश करण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवक सुदेश मयेकर यांनी केला आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी अधिकार्यांना धारेवर धरत ठेकेदार ‘निर्माण कंपनी’ने केलेल्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले.
विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये प्रभारी नगराध्यक्षांनाही चक्क तथ्य वाटत आहे. प्रत्यक्षात अनेक कामे झालेली नसतानाही नगर परिषदेकडून बिले दिली गेल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे ठेकेदार असलेली 'निर्माण कंपनी' आणि बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर नेमका कोणाचा आशीर्वाद होता? याची चर्चा सुरू आहे.