रत्नागिरी-दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे शिकारीला गेलेल्या विनोद बैकर या युवकाचा गावठी बनावटीच्या बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी दापोली पोलिसांनी तपासास सुरुवात केली असता, त्यांना अवैध गावठी बंदुकांचे घबाडच सापडले आहे. या प्रकरणातील सुत्रधारानेच मृत विनोद बैकर याला गावठी बनावटीची बंदूक दिली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी 8 बंदुकांसह 14 संशयितांना दापोली पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.
8 गावठी बंदुकांसह 14 संशयितांना अटक 16 बंदुका केल्या होत्या खरेदीदापोली तालुक्यातील साकुर्डे येथे शिकारीला गेलेल्या विनोद बैकर या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाला होता. तो वापरत असलेली गावठी बनावटीची बंदूक त्याने कोठून खरेदी केली होती, याचा तपास करताना दापोली पोलिसांना दापोली शहराजवळील शिवाजीनगर भोंजाळी येथील संशयित अमित मधुकर रहाटे हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे कळले. त्याच्या घरावर दापोली पोलिसांनी छापा मारला असता त्याने आपण पेंडूर( ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) याच्या कडून दोन वर्षांपूर्वी 16 बंदुका खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच या बंदुका आपण कोणाला विकल्या आहेत, याचीही माहिती त्याने पोलिसांना दिल्यावर दापोली पोलिसांनी या सर्व संशयितांकडे छापे मारुन 8 गावठी बंदुका जप्त केल्या. या प्रकरणी संशयित सूत्रधार अमित रहाटे याचेसह सौरभ म्हसकर, अभिषेक जाधव (जालगाव), सौरभ घवाळी (जालगाव), विजय आंबेडे (मौजे दापोली), विश्वास कानसे (मौजे दापोली), नरेश साळवी (करंजाणी), नीलेश काताळकर (खेर्डी), प्रशांत पवार (माथेगुजर), अनंत मोहिते (कोळबांद्रे), राजाराम भुवड (गिम्हवणे), समीर मोगरे (पोयनार,खेड), सुमीत शिगवण (मौजे दापोली), अमीत आलम (जालगाव), आशिष मोहिते (जालगाव) या संशयितांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या सर्वांची जामीनावर मुक्तता केली.
तीन जणांकडे या पाच प्रकरणांचा तपासया प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार अमीत रहाटे यांनी दापोली पोलिसांना सिंगल बोअरच्या तीन बंदुका आपण भोंजाळी गावचे स्मशानभुमीजवळ लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्याचीच जामीनावर मुक्तता झाली असल्याने या बंदुका नक्की कोठे लपवून ठेवलेल्या आहेत, याचा तपास आता दापोली पोलिसांना करावा लागणार आहे. गावठी बनावटीच्या बंदूक खरेदी विक्री प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हांची पाच प्रकरणे तयार करण्यात आली असून तीन जणांकडे या पाच प्रकरणांचा तपास देण्यात आला आहे.