रत्नागिरी - जिल्ह्यातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाणार जमीन व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. जागेच्या घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावसभावाची कंपनी असून या 'सुगी डेव्हलपर्स' कंपनीचे संचालक निशांत देशमुख यांनी १४०० एकर जागा परप्रांतियांना विकली आहे. जमीन घोटाळ्यात थेट मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले असून सुरुवातीला विरोध नंतर रत्नागिरीवासीयांना लुटायचे ही शिवसेनेची भूमिका असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
बुधवारी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेने प्रकल्पाला प्रथम विरोध केला आता यांच्या आशीर्वादाने परप्रांतीय या कोकणात घुसलेत, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, मुंबईतील सुगी डेव्हलपर्स या कंपनीत मुख्यमंत्री ठाकरे यांचे मावसभाऊ निशांत देशमुख संचालक आहेत. राजापूर येथे या कंपनीचे कार्यालय होते. कोदवली येथील अॅड. कावतकर यांनी या कंपनीमार्फत सुमारे १४०० एकर जागेचा व्यवहार परप्रांतियांसोबत केला. स्थानिकांची जागा परप्रांतियांच्या नावावर करून दिली आहे. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत हे व्यवहार पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या व्यवहारांना मुख्यमंत्री ठाकरे यांचा पाठिंबा होता का? अशी शंका निर्माण झाल्याचे राणे यांनी सांगितले.