रत्नागिरी -नाणार रिफायनरी प्रकल्प उभारणीबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला दोन महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे, अशी माहिती भाजपाचे राज्य महासचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. तसेच हा प्रकल्प आल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगारी दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालून हा प्रकल्प जनतेच्या भल्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी कोकणात आणावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यात कोरोनाच्या संकटामुळे मुंबईत अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशी सर्व लोक आता कोकणात दाखल झाली आहेत. त्यामुळे कोकणात बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकल्पाबाबत लवकर निर्णय घ्यावा. तसेच प्रकल्प दुसरीकडे जाण्याआगोदर नाणार रिफायनरीचा फेरविचार करावा, एकवेळ जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झाला नाही तरी चालेल पण रोजगार निर्माण करणाऱ्या नाणार प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी विनंतीही जठार यांनी राज्य सरकारला केली आहे.