रत्नागिरी- रिफायनरी प्रकल्पावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. रिफायनरीवरून भाजपचे प्रदेश चिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलेल्या वक्तव्याचा रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांनी समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
प्रतिक्रिया देताना रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम प्रमोद जठार यांची वायफळ बडबड सध्या सुरू असून, त्यात काही तथ्य नाही. प्रमोद जठार यांना सध्या काही काम नसल्याने त्यांना दिवसाढवळ्या स्वप्न पडू लागली आहेत. सरकार पडेल, मग आमचे सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, मग आम्ही तिकडे रिफायनरी आणू, अशी स्वप्ने त्यांना पडू लागली आहेत. पण, नाणार विरोधकांमुळे काय होऊ शकते हे जठारांनी देवगड येथे अनुभवले आहे, असे म्हणत वालम यांनी जठार यांच्यावर जोरदार टीका केली.
वालम म्हणाले, आम्हाला माहित आहे, की रिफायनरी पुन्हा येणार नाही, म्हणून आम्ही शांत आहोत. आम्ही सध्या स्थानिकांच्या जमिनी कुणी खरेदी केल्या याच्या चौकशीची मागणी सरकारकडे करत आहोत. नाणार येथील २०१६ ते २०१९पर्यंतचे जमिनींचे व्यवहार रद्द झाले पाहिजेत. त्यांची उच्चस्तरीय चौकशी शासनाने लावावी अशी मागणी आहे. त्यामुळे, समर्थक आता प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत. पण, यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू, असे अशोक वालम यांनी स्पष्ट केले आहे. वेळ पडल्यास त्यासाठी मोठे आंदोलन करण्याचा इशाराही अशोक वालम यांनी दिला.
आम्हाला तेल शुद्धीकरण कारखानाच नव्हे, तर प्रदूषणकारी कोणताही प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही. काजू, आंबा, करवंद, जांभूळ यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आल्यास त्याचे स्वागत करू. प्रकल्प यावेत, पण ते पर्यावरणपूरक असावेत, असेही वालम यांनी म्हटले.
हेही वाचा-'महाविकास आघाडी सरकार पडेल, पण रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही'