रत्नागिरी- शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडल्याने खळबळ उडाली. ही घटना देवरुख- रत्नागिरी मार्गावरील माळवाशी येथे घडली. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जीवदान दिले.
विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाला यश
देवरुख- रत्नागिरी मार्गावरील माळवाशी येथील संदीप चाळके यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे सोमवारी सायंकाळी नागरिकांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जीवदान दिले.
माळवाशी येथील संदीप चाळके यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे सोमवारी सायंकाळी नागरिकांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती संतोष जाधव आणि परिमल चाळके यांनी वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाचे अधिकारी आर. सी. भवर, परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगट यांच्या नेतृत्वाखाली देवरुखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक सागर गोसावी , एन. एस. गावडे , शर्वरी कदम, संतोष कदम, दिलीप गुरव घटनास्थळी दाखल झाले.
अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. सदरचा मादी बिबट्या एक वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.