रत्नागिरी - मेर्वी परिसरात 8 वेळा ग्रामस्थांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. या बिबट्याने गेले काही दिवस या परिसरात दहशत माजवली होती. या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकूण 20 व्यक्ती जखमी झाले होते. हा बिबट्या पकडला गेल्याने गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
'तो' बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात
ग्रामस्थांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. हा बिबट्या पकडला गेल्याने गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मेर्वी या परिसरातील सागरी मार्गावर गेली दोन वर्षे सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत. हे हल्ले झाल्यानंतर तातडीने वनविभागाला कळविले जात होते. मात्र, बिबट्या पकडण्यात अपयशच येत होते. बिबट्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या भागातून टीमही आल्या होत्या. या परिसरात वनविभागातर्फे गस्त सुरू होती. मात्र, बिबट्या आपला मार्ग बदलत असल्याने वनविभागाच्या पिंजऱ्यात सापडत नव्हता. रेस्क्यू टीमचे कॅमेरे व पिंजरे लावला की बिबट्या कुठेच दिसायचा नाही. त्यामुळे त्याला पकडण्यासंदर्भात कोणताही ठोस उपाय करूनही तो मिळत नसल्याने गावात भीतीचे वातावरण होते. गुरुवारी सकाळी अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे आढळून आले. गावातील ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिल्यावर विभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी या बिबट्याला ताब्यात घेतले. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश मिळाले आहे. लोकप्रतिनिधी यांनी ही वेळोवेळी वनविभागास सहकार्य केले होते. या बिबट्याची तपासणी करण्यात येणार असून तो तंदुरूस्त असल्यास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.