महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 30, 2020, 8:59 PM IST

ETV Bharat / state

सण साजरे करताना शासनाच्या निर्देशांचे पालन करा - जिल्हाधिकारी

बकरी ईद व गणेशोत्सव या सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

रत्नागिरी कोरोना अपडेट
रत्नागिरी कोरोना अपडेट

रत्नागिरी- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर येणारे सण साजरे करीत असताना शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन सर्व नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

पुढील महिन्यात येणाऱ्या बकरी ईद व गणेशोत्सव या सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीकक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावाकडे येत असतात. त्यामुळे चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थ यांच्यामधील मतभेद टाळण्यासाठी नागरी कृती दल, ग्राम कृती दल यांच्या स्थानिक स्तरावर बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून सण साजरा करावा.

कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग चांगले काम करीत आहे. या विभागातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी सफाई कर्मचारी व नर्स यांची मानधनावर भरती प्रक्रिया सुरू आहे. खाजगी रुग्णालयांना ॲन्टिजेन टेस्ट कीट पुरविण्यात आले आहेत. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू होत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये बेडची क्षमता वाढविण्यात येत आहेत. सद्य परिस्थितीमध्ये नर्स व डॉक्टर्स यांनी पुढाकार घेऊन कोरोना संदर्भात कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावेळी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी परिस्थितीशी अनुरुप होऊन शांततेत आणि शासनाने दिलेल्या सूचनांच्या अधिन राहून नागरिकांनी सण साजरे करावे व जातीय सलोखा कायम राखला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीमध्ये समिती सदस्य, विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांनी कोरोनामुळे येणारे सण साजरे करताना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत उपस्थित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी समिती सदस्यांनी शासनाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सण साजरे करण्यात येतील असे आश्वासित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details