रत्नागिरी - कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या जिल्हा रुग्णालयातील नर्सिंगच्या 5 विद्यार्थिनींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे या पाच विद्यार्थिनींना आज (बुधवार) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्यासह इतर डॉक्टर तसेच काही समाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गेले काही दिवस जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये मुंबईतून आलेल्या व्यक्तींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अशातच कोणतीही प्रवास हिस्ट्री नसलेल्या जिल्हा रुग्णालयातील एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आणि जिल्हा प्रशासनही हादरलं. कारण कोरोनाने थेट आरोग्य विभागामध्येच शिरकाव केला होता. त्यानंतर या विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये सुरुवातीला काही विद्यार्थिनींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर आणखी काही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आढळून आल्या. ही संख्या वाढत-वाढत 9 पर्यंत गेली.