रत्नागिरी- अवैधरित्या एलईडी फिशिंग करणार्या दोन नौकांवर सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी कारवाई केली आहे. भगवती बंदरापासून ९ वाजता या नौका एलईडी लाईट लावून मासेमारी करीत होत्या. या कारवाईत मत्स्य विभागाने ८ लाख रूपयांचे साहित्य जप्त केले आहे.
एलईडी फिशिंग विरोधात कारवाईचा बडगा -
एलईडी फिशिंगला बंदी असतानाही काही ठिकाणी एलईडी फिशिंग सुरू आहे. त्या विरोधात मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यापूर्वीदेखील एलईडी फिशिंग विरोधात पारंपारिक मच्छिमारांनी जोरदार आवाज उठविला होता. हर्णै परिसरात मच्छिमारांनी आंदोलनदेखील केले होते. एलईडी फिशिंग बंद व्हावी यासाठी आमदार योगेश कदम यांनीदेखील आवाज उठविला. त्यानंतर अवैधरित्या एलईडी फिशिंग करणार्यांविरोधात मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
सहाय्यक मत्स्य आयुक्त ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाची गस्तीनौका दोन दिवसांपूर्वी रात्रगस्तीसाठी समुद्रात गेली होती. यावेळी भगवती बंदरापासून ९ वावात दोन नौका बेकायदेशीररित्या एलईडी फिशिंग करीत होत्या. यावेळी गस्तीनौकेवरील पथकाने त्या दोन नौकांच्या दिशेने जावून बेकायदेशीररित्या सुरू असलेली मासेमारी तात्काळ थांबवली. तसेच तंजीला मर्यम, सफिना वाहिद या दोन नौकांवर कारवाई केली आहे.
या कारवाईत मत्स्य विभागाने २८ एलईडी लाईट, ३ जनरेटर असे मिळून सुमारे ८ लाख रूपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे. या दोन्ही नौका मिरकरवाडा बंदरामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ही कारवाई सं. अ. देसाई (परवाना अधिकारी गुहागर), श्रीम. दी. आ. साळवी, श्रीम. स्मि. दीं. कांबळे, स्व. बा. चव्हाण यांच्या पथकाने केली.