रत्नागिरी - करंबवणे, आयनी, भिले-केतकी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारपासून नदी काठालगत मृत माशांचा खच दिसत आहेत. लोटे येथील कारखान्यांचे प्रदूषित पाणी दाभोळच्या खाडीमध्ये सोडल्यामुळे मासे मेल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जल प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रीत दूषित पाणी दाभोळ खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे दाभोळ खाडीतील लाखो मासे दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. मागील दोन दिवसांपासून, करंबवणे, भिले-केतकी, आयनी परिसरात दाभोळ खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून येत आहेत. दरम्यान, या प्रकाराची माहिती सीईटीपी (सांडपाणी प्रक्रिया) व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.