रत्नागिरी -जिल्हयात कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. 6 एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज संध्याकाळी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. आजच त्याचा मृत्यू झाला. ही व्यक्ती दुबई येथून खेड येथे आली होती.
आत्तापर्यंत जिल्ह्यात तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. दरम्यान, आज मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून, रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. रत्नागिरीत आतापर्यंत 4 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. गुहागर येथील पॉझिटिव्ह रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तर आता 2 रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, खेड तालुक्यातील एक रहिवासी १८ मार्च रोजी खेड येथे आला होता. तेथे त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, गेल्या चार-पाच दिवसापूर्वी तो शहरातील डाक बंगला परिसरात राहण्यासाठी आला होता. दोन दिवसापूर्वीच या वृद्धाला ताप आल्यामुळे व साधारण लक्षणे लक्षात घेऊन त्याला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात 6 एप्रिलला दाखल करण्यात आले होते.
आज रात्री नऊ वाजल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रात्री साडेआठच्या दरम्यान त्याला मृत घोषित केले. या घटनेने सारा खेड तालुकाच नव्हे तर जिल्हाही हादरून गेला आहे. हा रुग्ण दुबईहून भारतात आला. त्यानंतर खेड येथे आला होता.
कोरोनामुळे रूग्ण मृत्यू होण्याची रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. प्रशासनाने तत्काळ अलसुरे गाव सील केले असून, तेथील लोकांचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. प्रशासन सतर्क झाले असून, सगळी यंत्रणा कार्यन्वित झाली आहे.