रत्नागिरी -हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मँगोनेट सुविधेअंतर्गत यावर्षी ४ हजार ५६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर, ३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले आहे.
आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ खुली व्हावी, यासाठी शासनाने २०१४-१५ पासून मँगोनेट प्रणाली सुरू केली. हापूसला उत्तम दर मिळावा यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत मँगोनेटचा पर्याय शोधण्यात आला आहे. ग्रेप्सनेटच्या माध्यमातून द्राक्षांची परदेशात निर्यात केली. या धर्तीवर हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी मँगोनेटचा पर्याय सहा वर्षापूर्वी निवडण्यात आला. नोंदणीदरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छुक आहे, त्याची माहिती ऑनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस पिकवला जात असल्याने दर्जेदार हापूसचे उत्पादन घेतले जाते. सन २०१४-१५ पासून मँगोनेट सुविधा सुरू करण्यात आली. तर, दरवर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. मँगोनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आंबा परदेशात निर्यात केला जातो. दरम्यान, युरोप, जपान, अमेरिका येथील व्यावसायिकांनी रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन पाहणी करून आंब्याची मागणी केली होती. त्यामुळे येथील बागायतदारांना चांगला दर मिळाला होता.