रत्नागिरी : Ramdas kadam on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महाराष्ट्रभर आंदोलनाचा धडाका लावला आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. परंतु कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असं रामदास कदम (Ramdas kadam) यांनी स्पष्ट केलं आहे. ते शनिवारी खेडमध्ये बोलत होते.
जरांगेंचा अभ्यास नाही : यावेळी रामदास कदम म्हणाले की, जरांगे यांनी जी मागणी केली, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunabi Certificate) द्या, माझी याला मान्यता नसून मी या विरोधात आहे. विदर्भामध्ये कुणबी-मराठा चालतं सगळं, पण कोकणामध्ये रोटी-बेटीचा व्यवहार देखील चालत नाही, याची कल्पना जरांगेंना नाहीय. त्यांचा कोकणचा, सर्व महाराष्ट्राचा तेवढा अभ्यास नाहीये.
कोणाचे आमदार अपात्र होतील? : आमदार अपात्रता प्रकरणी बोलताना रामदास कदम म्हणाले की, कोणाचे आमदार अपात्र होतील याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. मागील दहा महिने हा विषय सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतोय. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी अध्यक्ष का करत नाहीत, असा प्रश्न सर्वाना पडलेला आहे. याच्या आधी कुठल्याही न्यायालयाने विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप केला नव्हता. मात्र सध्या सातत्याने सर्वोच्च न्यायालय हे अध्यक्षांना आदेश देत आहे, आता अंतिम टप्प्यात ही लढाई आलेली आहे. अंतिम टप्प्यात हा निकाल आलेला आहे, माझं आडनाव काही जोशी नाहीय, त्यामुळे जो निकाल येईल तो मला काही सांगता येणार नाही. तसेच अध्यक्षांवर अविश्वास दाखवून, त्यांना आशा गोष्टी बोलणे हे अशोभनीय नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाहीय.
घोडामैदान लांब नाहीये :ते पुढे म्हणाले की, कदाचित उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला, तर एकनाथ शिंदे हे न्यायालयात जातील आणि जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, तोच निर्णय जर अध्यक्षांनी घेतला, तर उद्धव ठाकरे यांचे 15 आमदार अपात्र होतील, असं मला वाटतं आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. आता घोडा मैदान लांब नाहीये, 'दूध का दूध, पाणी का पाणी बहुत जलदी हो जायेगा', अध्यक्षांना माझी विनंती आहे की, एकदाचा हा खेळ संपवून टाका, काय तो निकाल देऊन टाका, कोणाला हायकोर्टात जायचं असेल, सुप्रीम कोर्टात जायचं असेल, कोणाला घरी बसायचं आहे ते बसतील. पण अध्यक्षांच्या कामामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, हा महाराष्ट्र आहे बिहार नाही.