रत्नागिरी -तिवरे धरण फुटले आणि संपूर्ण राज्य हादरून गेले. पण जलसंधारण राज्यमंत्री मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्या भोवती गेले १२ दिवस या दुर्घटनेचे राजकारण फिरत आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. पण खरंच खेकड्यांनी धरण फोडले असावे का? स्थानिकांचे आणि खेकडा अभ्यासकांचे नेमके काय म्हणणे आहे. पाहूया याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट.
ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट 2 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उध्वस्त झाले. एकेका कुटुंबातील 5 ते 6 जण धरणाच्या पाण्याने आपल्या कवेत घेतले ते कायमचेच. पण खेकड्यांनी धरणाला भगदाड पाडल्यामुळे हे धरण फुटल्याच्या जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे राजकारण ढवळून निघाले. विरोधकांनाही सावंत यांच्या वक्तव्यामुळे आयते कोलीत मिळाले. पण खेकड्यांनी भगदाड पाडलं आणि धरण फुटलं ही बाब स्थानिकांनाही काही पटत नाही.
जगामध्ये गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या 1280 जाती आढळतात. भारतात गोड्या पाण्यातील 96 प्रकारचे खेकडे आढळतात. यापैकी ब्यरीटेलफुसा कुनीकुलारीस ही जात लोकप्रिय असून महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये आढळते. पण गोड्या पाण्यात आढळणारा हा खेकडा चालणारा असतो, तो पोहणारा नसतो. गोड्या पाण्यातील खेकडा हा जास्तीत जास्त 300 ते 500 ग्रॅम पर्यंत वाढतो. समुद्र किंवा खाडीतील खेकडे मोठ्या प्रमाणात बिळ पाडतात. ते खूप लांबपर्यंत बिळ पाडू शकतात. त्यामानाने गोड्या पाण्यातील या खेकड्यांची शक्ती देखील कमी असते. तो जास्तीत जास्त 3 ते 4 फुटापर्यंत बिळ पाडू शकतो. पण गोड्या पाण्यातील खेकड्यांमुळे धरण फुटले असे आजपर्यंत तरी ऐकिवात नसल्याचे या विषयातील तज्ञ सांगतात.
गोड्या पाण्यातील खेकडे 3 ते 4 फुटापर्यंत बिळ पाडतात. त्यामुळे हे खेकडे धरणाला एवढे मोठे भगदाड पाडणे शक्य नाही. त्यामुळे हे धरण प्रशासनातील खेकड्यांमुळे फुटले. ज्या खेकड्यांनी स्थानिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले नाही अशा खेकड्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे.