रत्नागिरी- स्पर्धेच्या युगात अनेकांना इको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा विसर पडत चालला आहे. अनेक गणेशभक्त शाडूच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घरी आणतात. कारण त्या स्वस्त मिळतात. पण, या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. यावर रत्नागिरीच्या सुशिल कोतवडेकर यांनी पर्याय शोधला आहे.
गणेशमूर्तीकार असलेले सुशिल चक्क कोकणात उपलब्ध होणाऱ्या लाल मातीपासून गणपती मूर्ती तयार करतात. गेले 7 वर्षे ते लाल मातीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत आहेत. या मूर्तीना मागणीही चांगली आहे. एक फुटापासून ते 4 फुटांपर्यत विविध रुपातल्या साडेचार हजाराहून अधिक मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत.
लाल मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती रत्नागिरी जवळच्या सुफलवाडीतीस सुशील कोतवडेकर गेल्या 28 वर्षापासून गणेशमुर्ती घडवण्याचे काम करत आहेत. पण, गणपतीच्या मूर्ती करत असताना या मूर्ती पर्यावरण पुरक असाव्यात, असे सतत त्यांना वाटत असे. त्यामुळे त्यांनी कोकणात मिळणाऱ्या लाल मातीचा उपयोग करत गणेशमूर्ती घडवण्यास सुरूवात केली. कौल किंवा मातीची भांडी ज्या मातीपासून बनवतात ती कोकणातली लाल माती त्यांनी गणेशमूर्ती बनवण्यासाठी वापरली. कोकणात ही माती सहज कुठे हि मिळते. या मातीपासून एका फुटापासून ते 5 फुटापर्यंतच्या सुबक मूर्ती कोतवडेकर बनवतात. गेल्या 7 वर्षापासून कोतवडेकर लाल मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम करत आहेत. त्यात ते यशस्वीही झाले आहेत.
कोतवडेकर 500 रुपयांपासून ते अगदी 10 हजार रुपयापर्यंत मूर्तींची विक्री करतात. यावर्षी या लाल मातीपासून तब्बल साडेतीन हजारांहून अधिक मूर्ती त्यांनी बनवल्या आहेत. सध्या मूर्तीवर विविध आभूषण चढवण्याचे काम सुरु आहे. कोतवडेकर यांच्या या लाल मातीच्या गणपतीना संपूर्ण जिल्ह्यातून मागणी आहे.
कोतवडेकर यांच्या या लाल मातीच्या गणेशमूर्तीना जिल्ह्यासह मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात देखील मागणी आहे. शाडूच्या मातीपेक्षा या लाल मातीचे वजन अधिक आहे. पण, या लाल मातीचे गणपती पाण्यात लवकर विरघळतात. त्यामुळे लाल मातीच्या या गणेश मुर्तींचा उपयोग खऱ्या अर्थांन पर्यावरण संरक्षणासाठी होत आहे.