रत्नागिरी -राज्यातील आघाडी सरकार हे खंबीर असून, केंद्रात राज्याची बाजू मांडणारे आमचे आघाडीचे खासदार देखील तत्पर आहेत. केंद्राने राज्यच्या विकासात भर टाकावी, अशी मागणी आमचे खासदार करत आहेत. तरीही केंद्र शासन महराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहे. दिल्लीसमोर झुकणार नाही, पण दिल्लीकडून चांगली कामे करून घेण्याची आपली ताकद आहे, असे राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दापोलीत सांगितले. दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे ( Aditya Thackeray inaugurate shivaji maharaj statue dapoli ) अनावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा -आंबिवली रेल्वे स्थानकात फेरीवाल्याकडून पोलिसाला बेदम मारहाण
दापोलीत होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणचा समारंभ जणू एखाद्या सणासारखा साजरा होत असताना पाहून आनंद व्यक्त करून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड किल्ल्यासाठी 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर कोकणातील सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली असून, समितीच्या माध्यमातून किल्ले संवर्धनाचे काम केले जात आहे. किल्ले संवर्धनासाठी वेळप्रसंगी दिल्लीकडे पाठपुरावा करावा लागेल तो सुद्धा करू, परंतु कोणत्याही परिस्थितीत किल्ले संवर्धनाचे काम थांबणार नाही.