रत्नागिरी -वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांना कोरोना चाचणी नंतरच प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
माहिती देताना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव जिल्हा परिषदेत प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक
जिल्ह्यामध्ये कोविड 19 साथ नियंत्रणाचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. सद्यपरिस्थिती पाहता कोविड आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे कोरोना विषाणूची लागण इतरांना होऊ नये व यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये कोविड 19 ची अँटिजेन चाचणी व आरटीपीसीआर चाचणी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यात आली आहे.
अभ्यागतांना बंदीच
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्यालयात अभ्यागतांना प्रवेश बंदी आहे. अभ्यागतांना संपर्क साधावयाचा असल्यास विभाग निहाय संपर्क क्रमांक व पत्र व्यवहारासाठी ईमेल यादी जि.परिषदच्या प्रवेश द्वारावर ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील जिल्हा परिषदेला पाठवावयाचे टपाल पंचायत समिती स्तरावर एकत्रित करून पंचायत समितीमधील एकच कर्मचारी जिल्हा परिषदेला येऊन टपाल स्वागत कक्षात देऊन बाहेरच्या बाहेर जाईल. इतर कोणत्याही अभ्यागतांना जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. फारच महत्वाचे काम असेल तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उपलब्ध करून दिलेल्या अँटिजेन चाचणी सुविधेतून चाचणी केल्यानंतरच अभ्यागतांना जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश दिला जाईल.
हेही वाचा -जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा, दुसरा डोस घ्यायला येणाऱ्यांनाच फक्त मिळतेय लस
यापुढे जिल्हा परिषदेच्या सर्व सभा 30 एप्रिल 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. तसेच, जिल्हा परिषदेशी संबंधित पत्रव्यवहार शक्यतो ईमेलद्वारे करावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सर्व खाते प्रमुखांना केल्या.
हेही वाचा -'राजकीय नेत्यांनी आम्हाला संपवण्याचा विडाच उचलला आहे'