रत्नागिरी- भारतीय निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये हेराफेरी केल्याचा आरोप खोटा असल्याचा खुलासा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. लोकसभेचा निकाल धक्कादायक आहे. तसेच या निकालात हेराफेरी झाल्याचा संशय खासदार नारायण राणे यांनी निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर व्यक्त केला होता. त्यावरच आज जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नारायण राणेंना प्रत्त्युत्तर देताना निवडणूक निर्यण अधिकारी सुनील चव्हाण रत्नागिरीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन बंगळूरू येथून आणलेल्या होत्या. त्याचा यापूर्णी कुठल्याही निवडणुकीत वापर झालेला नाही. या सर्व मशीनची तपासणी करण्यात आली. तसेच या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार होता. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती, असे चव्हाण म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाल्यानंतर आयोगाच्या सॉफ्टवेअरच्या आधारे मशीनची २ वेळा सरमिसळ करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्या त्या मतदार संघातील यंत्रे जी. पी. एस. इनेबल वाहनाद्वारे पोलीस संरक्षणात पाठवण्यात आली. तसेच आयोगाच्या सुचनेनुसार तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये सर्व मशीन ठेवण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कमीशनींग अर्थात उमेदवार सेटींगची प्रक्रिया होते. याबद्द्लची वेळ दिनांक आणि ठिकाण याची माहिती कळवण्यात आली होती. याप्रसंगी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच सर्वसमक्ष १ हजार मते देऊन ईव्हीएमची तपासणी करण्याची प्रक्रिया सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर झाली. त्यानंतर या पेट्या संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या. संपूर्ण स्ट्राँग रुम परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. राजकीय पक्षाचे उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्यासाठी या स्टाँग रुमची पाहणी करणे तसेच सी.सी.टी.व्ही.चे चित्रीकरण बघण्याची सोय केली होती. या स्ट्राँग रुमवर देखरेख करण्यासाठी राजपत्रीत अधिकाऱ्यांच्या दर तासाला एक अशी चोवीस तास ड्युटी लावण्यात आली होती. याव्यतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दैनंदिन स्वरुपात वेळोवेळी भेट देऊन याची तपासणी केलेली असल्याचे ते म्हणाले.
मतदानाच्या दिवशी आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करून मतमोजणी यंत्रे केंद्रावर नेण्यात आली. त्यानंतर ती येथील मिरजोळे एमआयडीसीमधील फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात ठेवण्यात आली. याठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा निहाय ५ इव्हीएमचे कन्ट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची पडताळणी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी एकाही मताचा फरक दाखवला नव्हता. पूर्ण प्रक्रिया योग्यरित्या पार पडली आहे. त्यामुळे हेराफेरी झाल्याचे आरोप निराधार ठरत असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.