रत्नागिरी- बहिण-भावातील नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. पण, रत्नागिरीतल्या अविष्कार शाळेतील गतिमंद मुलांनी विशेष राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. कारण या राख्या पर्यावरण पूरक आहेत.
रत्नागिरीतील या 'स्पेशल' विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक राख्यांचा 'अविष्कार'
रत्नागिरीतल्या अविष्कार शाळेतील गतिमंद मुलांनी विशेष राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. कारण या राख्या पर्यावरण पूरक आहेत.
अविष्कारमधील १७ विद्यार्थी या राख्या तयार करत आहेत. ४० टक्के कागदाचा लगदा, ६० टक्के शाडूच्या मातीपासून बनविलेल्या या राख्यांमध्ये फुले, काकडी, पडवळ, मिरची अशी विविध बिया टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे याला प्लँटेबल सीड, असे नाव देण्यात आले आहे. रक्षाबंधनानंतर ही राखी कुठे पडली किंवा कुंडीत विसर्जीत केली की यापासून रोपे तयार होऊ शकतात.
या मुलांनी जवळपास साहेतीन हजार राख्या तयार केल्या आहेत. ही आगळी वेगळी पर्यावरणपूरक संकल्पना ऐकून अनेक बहिणी सध्या या राख्या खरेदी करण्यासाठी अविष्कार शाळेत गर्दी करत आहेत. या राख्यांचे वजन पाच ग्रॅमपासून ते अकरा ग्रॅम एवढेच आहे. विविध रंगात आणि आकर्षक सजावट केलेल्या या राख्यांना मोठी मागणी आहे. एकीकडे भाऊ आणि बहिणीचे नाते जपताना निसर्गासोबतही आपले नाते जपले जाणार आहे.
आपले पारंपारिक सण साजरे करतानच पर्यावरणाशी आपले नाते जपत त्याचीही काळजी करणारे हे काम कौतुकास्पदच म्हणावे लागेल.