रत्नागिरी -सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या किनाऱ्यावर यावर्षी पुन्हा एकदा निळ्या लाटांमुळे समुद्र किनारा चमकू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून थंडीच्या दिवसात हा अनुभव येऊ लागला आहे. साधारण डिसेंबर महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत सगळ्याच कोकण किनाऱ्यावर कमी अधिक प्रमाणात या लाटा दिसतात.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या किनाऱ्यावरील चमकणाऱ्या लाटांचे रहस्य प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी समजावून सांगितले 'हे' आहे लाटा प्रकाशमान होण्यामागील कारण -
किनाऱ्याच्या लाटा उजळण्यामागे समुद्री जीव आहेत. या जीवांना प्लवंग असे म्हणतात. त्यांचे शास्त्रीय नाव नॉक्टील्युका (noctiluca) आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात. जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात. या प्राण्यांमध्ये जैविक प्रकाश(bioluminescence ) निर्माण करण्याची क्षमता असते. यामुळे किनाऱ्यावर येऊन जेव्हा लाटा फुटतात तेव्हा ते प्रकाशमान होतात आणि संपूर्ण लाट उजळून जाते, अशी माहिती सागरी जीव अभ्यासक प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी दिली.
स्थानिक भाषेत याला 'पाणी पेटले' किंवा 'जाळ' असे म्हणतात -
रत्नागिरीचे मच्छिमार याला 'पाणी पेटले' किंवा 'जाळ' असे म्हणतात. यापूर्वी त्याचे प्रमाण अतिशय कमी होते, असे जुने जाणते मच्छिमार सांगतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून याचे प्रमाण वाढल्याने ते नजरेत येऊ लागले आहे. गेल्या चार वर्षांचा अनुभव असा आहे की, थंडीचा ऋतू सुरू झाल्यानंतर हे प्लवंग कोट्यवधींच्या संख्येने रत्नागिरीच्या किनाऱयावर येतात. किनाऱ्यावरील लाटा फ्लोरोसंट लाईट पेटवावा, तशा प्रकाशमान होतात. तापमानातील बदलामुळे हे जीव इतक्या मोठ्या संख्येत देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आले आहेत, असे अभ्यासक सांगतात. या चमकणाऱ्या लाटा म्हणजे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवी पर्वणी होत आहेत.
बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स -
हा एक समुद्री एकपेशीय जीव आहे. सामान्यपणे यांची गणती समुद्री शेवाळामध्ये केली जाते. समुद्राच्या पाण्याची क्षारता आणि तापमान यानुसार यांचे वितरण असते. हा जीव 'फायटोप्लॅन्कटन्स' आणि 'डिऍटॉम्स' हे मोठ्या प्रमाणात खातात. हे दोन्ही घटक माशांचे खाद्य आहेत. बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्सने माशांचे अन्न खाल्ल्याने माशांच्या पैदासीवर याचा परिणाम होतो. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्सचे वाढते प्रमाण धोकादायक आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.