महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रयोगशाळेतील संशोधन प्रत्यक्ष शेतात पोहोचले तरच शेतकऱ्यांचा विकास होईल - राज्यपाल - Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth convocation

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी होण्याकरिता संशोधन शेतापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान सोहळा उत्साहात
डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान सोहळा उत्साहात

By

Published : Feb 16, 2020, 11:05 PM IST

रत्नागिरी - विद्यापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्याने प्रयोगशाळेत शोध लावले जात आहेत. संशोधन होत आहे. याचाच प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी होण्याकरिता संशोधन शेतापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान सोहळ्यात केले. या पदवीदान समारंभात ६३ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट तसेच ३१७ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि ३१४४ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान सोहळा उत्साहात

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधताना राज्यपाल म्हणाले, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या सर्वसाधारण विकास दरात कृषी क्षेत्राचा वाटा ५० टक्के होता. तो आता घटून १४ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली. त्यावेळी राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा असणारा २८ टक्के वाटा घटून आता तो १२ टक्क्यांवर आला असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील ५० टक्के वर्ग शेतमजुरी आणि नोकरीच्या क्षेत्रात आहे. असे असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी संशोधनाची मदतच होणार आहे. यात विद्यापीठाने आपला वाटा उचलावा.

रत्नागिरी मधील भूमी मला माझ्या उत्तरांचलची आठवण करुन देणारी भूमी आहे. येथील विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोत्तम रत्न म्हणून नाव उज्वल करण्याची कामगिरी करावी अशा शुभेच्छा मी देतो, असे राज्यपाल याप्रसंगी म्हणाले. हे मराठी राज्याचे कृषी विद्यापीठ आहे त्यामुळे यापुढील काळात विद्यापीठाने पदवीदान समारंभ मराठी भाषेत घ्यावा, अशी सूचनाही राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणात केली.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रगतीचा आलेख याप्रसंगी मांडला. मत्स्य शिक्षण महाविद्यालयाच्या काही पदव्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत दुरुस्ती केल्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत तसेच विद्यापीठाचा दर्जा सुधारणे बाबत नवे कृषिमंत्री तानाजी भुसे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले.

हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर

या सोहळ्यास व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री तानाजी भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.संजय भावे, संशोधन संचालक डॉ.पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. खांदेतोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा -'आयलॉग'ला विरोध करण्याची आवश्यकता नाही, प्रकल्पाबाबत शिवसेनेत संभ्रमावस्था?

ABOUT THE AUTHOR

...view details