रत्नागिरी- सध्या क्रिकेटच्या चाहत्यांना इंग्लडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वकरंडकाचा फिव्हर चढला आहे. विश्वकरंडक कोण पटकावणार याची उत्सुकता अनेकांना आहे. अगदी गल्लीबोळात या वर्ल्डकपचा फिवर पहायला मिळत आहे. कोणी विश्वकरंडकासारखी हेअर स्टाईल करतोय, तर कोणी चेहऱ्यावर, शरीरावर विश्वकरंडकाची प्रतिकृती काढत असल्याचे पहायला मिळत आहे. रत्नागिरीतही एका क्रिकेटवेड्या चाहत्याने खडूमध्ये तयार केलेली विश्वकरंडकाची प्रतिकृती सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे.
क्रिकेटवेड्या चाहत्याने खडूमध्ये तयार केली २ सेंमीची विश्वकरंडकाची प्रतिकृती - हेअर स्टाईल
रत्नागिरीत राहणारा दिप्तेश पाटील क्रिकेटचा मोठा चाहता आहे. सुई आणि कटरचा वापर करून दिप्तेशने ३ तासात चक्क २ सेंटीमीटरचा विश्वकरंडक खडूमध्ये कोरला.
रत्नागिरीत राहणारा दिप्तेश पाटील क्रिकेटचा मोठा चाहता आहे. दिप्तेश विश्वकरंडकातील प्रत्येक सामना पाहतो. क्रिकेटवेड्या दिप्तेशला खडू किंवा पेन्सिलमध्ये अगदी छोट्या प्रतिकृती साकारण्याचा छंद आहे. यापूर्वी त्याने गणपती, रेल्वे, बुद्दीबळातील प्यादी खडूमध्ये कोरल्या आहेत. याच संकल्पनेतून दिप्तेशच्या डोक्यात एक कल्पना आली. खडूमधून त्याने क्रिकेटचा विश्वकरंडक कोरण्याचे ठरवले. सुई आणि कटरचा वापर करून दिप्तेशने ३ तासात चक्क २ सेंटीमीटरचा विश्वकरंडक खडूमध्ये कोरला. या कोरलेल्या विश्वकरंडकाचे वजन केवळ ५०० मिलीग्रॅम म्हणजेच १ ग्राम वजनापेक्षाही कमी आहे.
विश्वकरंडकाची अगदी हुबेहुब प्रतिकृती दिप्तेशने खडूत काही तासात साकारली आहे. केवळ २ सेंटिमीटरच्या उंचीचा हा वर्ल्डकप बनवण्यासाठी दिप्तेशने प्रचंड मेहनत घेतली आहे. आपण खडूत कोरलेला हा वर्ल्डकप भारतीय टिमला द्यावा, अशी त्याची प्रचंड इच्छा आहे. दिप्तेशने खडूमध्ये कोरलेला हा विश्वकरंडक कसा आहे, याची उत्सुकता अनेकांना आहे. त्यामुळे दिप्तेशचे क्रिकेटवेडे अनेक मित्र हा वर्ल्डकपची प्रतिकृती पाहण्यासाठी त्याच्या घरी येतात. दिप्तेशने खडूत साकारलेली ही कलाकृती पाहून त्यांनाही दिप्तेशचा अभिमान वाटतो.