महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन; निवृत्तीनंतरही सेवा बजावत 42 लहान मुलांना केले कोरोनामुक्त - रत्नागिरी कोरोना अपडेट

कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांसाठी डॉ. दिलीप मोरे देवदूत ठरले होते. 42 लहान मुलांना त्यांनी कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले. याच दरम्यान त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आणि आज त्यांचे निधन झाले.

Dr.Dilip More
डॉ.दिलीप मोरे

By

Published : Aug 6, 2020, 12:29 PM IST

रत्नागिरी-सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ व शासकीय रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर आणि कोरोनाच्या काळात लहान मुलांसाठी देवदूत ठरलेले डॉ. दिलीप मोरे यांचे गुरुवारी पहाटे जिल्हा रुग्णालयात निधन झाले. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना झालेल्या 42 छोट्या बालकांना त्यांनी कोरोनापासून मुक्त केले होते. लहान मुलांना कोरोनामुक्त करता करता डॉ. दिलीप मोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती. जवळपास 40 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी रुग्णसेवा केली. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी जिल्हा रुग्णालयात सेवा देण्याचे काम सुरू ठेवले होते.

कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांसाठी डॉ. मोरे देवदूत ठरले होते. 42 लहान मुलांना त्यांनी कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले. याच दरम्यान त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा कोरोनाशी लढा सुरू होता.

डॉ. दिलीप मोरे यांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण रत्नागिरीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीकरांनी एक चांगला मनमिळाऊ डॉक्टर व कोरोनायोद्धा गमावला आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details