रत्नागिरी -कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी मंदिरं उघडली आहेत. या वर्षीच्या शेवटच्या अंगारक चतुर्थीसाठी पहाटेपासून भाविकांनी गणपतीपुळेत(Ganpatipule Temple) श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकर तोडगा निघूदे, असं साकडं गणपतीपुळेतील श्रींच्या चरणी आज भाविकांनी घातल्याचं पाहायला मिळालं.
एसटी संपाचा भाविकांना फटका -
या अंगारक चतुर्थीला भाविकांना एसटी संपाचा फटका बसला आहे. त्यात अद्यापही असलेली कोरोनाची भिती, त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावलेली पाहायला मिळाली.
दरवर्षी अंगारक चतुर्थीसाठी शेकडो एसटीच्या बसेस गणपतीपुळे इथं भाविकांना घेवून येत असतात. मात्र, एसटी संपाचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर झाला आहे. भाविकांना घेऊन येणाऱ्या एसटी बसेस यावर्षी आल्याच नाहीत. त्यामुळे यावर्षी जवळपास 40 ते 50 टक्के भाविकांची संख्या घटल्याचं पाहायला मिळालं.