रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात दरवर्षी फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा ( Dev Bhairi Holi Palanquin Meet Celebration ) रंगतो. वर्षातून केवळ एकदाच रंगणारा आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या हा उत्सवाची झलक पाहण्यासाठी हजारो भाविक या पालखी भेटीच्या क्षणावेळी उपस्थित असतात.
रत्नागिरीच्या ग्रामदैवतांच्या भेटी सोहळा कोकणातला होळी सण -
कोकणाच्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन होळीच्या माध्यमातून कोकणात होत आले आहे. आजही अनेक प्रथा परंपरा तेवढ्याच श्रद्धेने जपल्या जातात. फाल्गुन पोर्णिमेच्या रात्री रत्नागिरीतल्या श्री दैव भैरी देवळात अनोखा सोहळा रंगतो. तो म्हणजे पालखी भेटीचा. पालखी भेटीचा हा क्षण सुरु होण्याआधी तासंतास भैरी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उमटते. ढोल ताशांच्या गजरात परिसर दणाणतो.
दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा -
रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे दैवत असलेल्या श्री देव भैरी देवळात पालख्या भेटीला येतात. पालखी भेटीला येणं हा एक इथल्या भाविकांसाठी सोहळा बनतो. कारण पालखी भेटीला येणार म्हणजे हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिराच्या आजूबाजूला जमा झालेले असतात. फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री हा देखणा सोहळा रंगतो. बारा वाड्यांचा राजा श्री देव भैरीबुवा मंदिरात ऐटबाज पालखीत रुप लावून बसवला जातो. सडामिर्या आणि जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्या भैरीबुवाच्या भेटीला येतात. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला.
अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी दूरदूरवरुन भाविक गर्दी -
दोन ग्रामदैवते एकमेकांना भेटतात हा अभूतपूर्व सोहळा आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक रत्नागिरीकर हातातील सर्व कामे बाजूला ठेऊन श्रीदेव भैरीच्या मंदिरात गर्दी करतो. जमलेल्या हजारो हातांनी या पालख्या उचलल्या जातात. श्रीदेव भैरीच्या मंदिरात होणारी ही देवांची भेट उपस्थित असलेल्या प्रत्येकाला रोमांचित करते. असा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी दूर दूर वरुन भाविक गर्दी केली होती.
हेही वाचा -Holi Celebration Photos : राज्यभरात कोरोनानंतर 'निर्बंधमुक्त' होळी उत्साहात साजरी