चिपळूणच्या खाडीपट्ट्यात अनधिकृतपणे वाळू उत्खनन, कारवाईच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष?
चिपळूणच्या खाडीपट्ट्यात राजरोसपणे अनधिकृतपणे वाळू उत्खनन सुरु आहे. यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे
रत्नागिरी- जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त एकालाच हातपाटी वाळू उत्खननाचा परवाना मिळालेला आहे. मात्र असे असतानाही चिपळूण तालुक्यातील अनेक खाडीभागात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. मात्र प्रशासन याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करतय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राजरोसपणे अनधिकृतपणे वाळू उत्खनन
सध्या चिपळूण तालुक्यातील परवानगी नसतानाही खाडीपट्ट्यातील गांंग्रई, मालदोली, चिवेली, दोणवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे हातपाटीद्वारे बेसुमार वाळू उत्खनन सुरू आहे. गांंग्रई खाडीत तर जवळपास 25 ते 30 बोटींच्या साहाय्याने राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू आहे. अगदी गांंग्रई जेटीवरून या बोटी वाळू उत्खनन करताना अगदी दिवसाढवळ्या दिसतात, मात्र स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना हे दिसत नाही का? की याकडे ते कानाडोळा करत आहेत, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.