रत्नागिरी -दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली, यावरून विरोधकांकडून भाजपवर आरोप होत आहेत. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या त्रासाला कंटाळून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी मोहन भाईंना त्रास दिला, त्या सर्व अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
'भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांची आत्महत्या'
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, गोरगरिबांचा कैवारी आणि त्यांना आधार देणारा आधारवड अशी प्रतिमा दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची होती. मात्र भाजपने डेलकर यांचा छळ केला, त्यांना मानसिक त्रास दिला, त्यालाच कंटाळून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. आपल्याला कशापद्धतीने त्रास देण्यात आला हे त्यांनी अधिकाऱ्याच्या नावानिशी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. या सुसाईड नोटचा सखोल तपास करावा अशी मागणी आम्ही सर्वांनीच केली असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.
भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांची आत्महत्या 'त्या' अधिकाऱ्यांना तातडीने निलंबीत करावे
डेलकर हे अत्यंत दिलदार स्वाभावाचे होते, भाजपमध्ये येण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येत होती, मात्र त्यांनी पक्षात प्रवेश न केल्यामुळे, त्यांचा छळ करण्यात आला. ज्या अधिकाऱ्यांनी डेलकर यांना त्रास दिला, त्यांचे तातडीने निलंबन करावे अशी मागणी देखील यावेळी राऊत यांनी केली आहे.