रत्नागिरी-निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला. रत्नागिरी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणार्या वार्यांनी झाडे मुळापासून उन्मळून घरांवर कोसळली. झाडे कोसळल्याने रत्नागिरी तालुक्यात पाच जण जखमी झाले. तर काही घरांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दिवसभर निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसत होता. रत्नागिरी तालुक्यातील शहर तसेच अनेक गावेही समुद्र किनाऱ्यानजिक आहेत. त्यामुळे वेगवान वार्यांनी कुणाच्या घराचे, शेडचे तर कुणाच्या गोठ्यांचे छत उडाले.
मिरजोळे येथील एका घरावर झाड पडून तिन जण जखमी झाले. उंडी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच पूर्णगड येथील एका घरावर झाड कोसळल्यामुळे एक जण जखमी झाला आहे. मजगाव येथील पंजाब नॅशनल बँकेजवळील एका घरावर झाड पडले, कुवारबाव येथील सुनिता गावकरांच्या घराचे पत्रे उडाले, फणसोपातील सुनिल साळवींच्या घराचे, भोकेत एका घराचे, जाकिमिर्यातील प्रभाकर जाधव यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले.