रत्नागिरी - सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील तेलयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत आहेत. याचा थेट फायदा भारतातील ग्राहकांना द्यायचा तर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी खाली येऊ शकतात. मात्र, हे सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून असल्याचे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी म्हटले आहे.
9 मार्चला पेट्रोलचे दर 77 रुपये 47 पैसे होते. तर, डिझेलचे दर 66 रुपये 39 पैसे होते. मात्र, आज (11 मार्च) पेट्रोल 29 पैशांनी उतरले असून आजचा दर 77 रुपये 18 पैसे आहे. डिझेलही 26 पैशांनी उतरले असून डिझेलचा आजचा दर 66 रुपये 13 पैसे इतका आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या कमी होत असलेल्या किमती पाहता केंद्र सरकारने याचा भारतातील ग्राहकांना थेट फायदा द्यायचे ठरवले तर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी खाली येऊ शकतात. मात्र हे सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून असल्याचे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हे दर उतरत असल्याने पेट्रोल पंप चालकांना मात्र याचा तोटा सहन करावा लागत आहे. कारण, आज पेट्रोल खरेदी करायचे आणि उद्या किंमत कमी झाल्यास कमी झालेल्या किमतीत पेट्रोल-डिझेल विक्री करायची अशी परिस्थिती पंप मालकांवर आली आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती दर दिवशी कमी-जास्त न करता पंधरा दिवसांतून एकदा दराबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पेट्रोल पंप चालकांनी केली असल्याचे लोध यांनी सांगितले.