12 ऑगस्टनंतर जिल्ह्यात जाणाऱ्यांना कोविड टेस्ट अनिर्वाय रायगड : गणेशोत्सव सणाला येणाऱ्या चाकरमानी यांनी 12 ऑगस्ट पूर्वी जिल्ह्यात दाखल व्हायचे असून शासनाने होम क्वारंन्टाईन कालावधी हा दहा दिवसांचा केला आहे. 12 ऑगस्टनंतर जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांनी आपली कोरोना तपासणी करून यायचे आहे. अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. जिल्ह्यात 12 ऑगस्टनंतर येणाऱ्या गणेशभक्तांना कोविड तपासणी करून यायचे असले तरी ही तपासणी खर्चिक असल्याने रॅपिड अँटीजेन तपासणी किंवा अँटीबॉडी तपासणीला शासनाने मान्यता द्यावी अशी सूचनाही केल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सव सणानिमित्त आज रायगड जिल्हा शांतता कमिटीची बैठक पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यलयातील राजस्व सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना होम क्वारंटाईन कालावधी कमी करण्याबाबत चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावेळी कोरोनाचे संकट असल्याने यावेळेचा गणेशोत्सव हा आरोग्यदायी सण म्हणून साजरा करा असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना 12 ऑगस्ट पर्यंत येण्यास मुभा असून दहा दिवस होम क्वारंन्टाईन राहायचे आहे.
12 ऑगस्टनंतर येणाऱ्या नागरिकांनी आपली कोरोना तपासणी करून, ई-पास घेऊन गावात दाखल व्हायचे आहे. कोविड तपासणी ही खर्चिक असल्याने याचा आर्थिक फटका हा नागरिकांच्या खिशाला बसणार आहे. यासाठी अँटीजेन किंवा अँटीबॉडी तपासणी करून घेण्यास शासनाला विनंती केली आहे. जेणेकरून चाकरमानी यांना तपासणी खर्च कमी होऊ शकतो. अशी, माहिती अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सव आगमन, विसर्जन मिरवणूका काढू नका, गर्दी करू नका. यावेळेचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करून आरोग्यदायी उत्सव साजरा करा. वयोवृद्ध, लहान मुलांना गणेश विसर्जनवेळी समुद्र, नदी याठिकाणी नेऊ नये. असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.
कोविड-19 स्वॅब लॅब तपासणी कामाची पालकमंत्री यांनी केली पाहणी
रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे कोविड-19 स्वॅब लॅब तपासणी शासनाने मंजूर केली आहे. ही लॅब जिल्हा सामान्य रुग्णालयात उभे करण्याचे काम सुरू असून या कामाची पाहणी आज पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने हे उपस्थित होते. लॅबचे उदघाटन हे 15 ऑगस्ट रोजी करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाचा असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. या लॅबमुळे जिल्ह्यातील नागरिकांची कोविड चाचणी ही सोयीस्कर होणार असून लवकर रिपोर्ट मिळण्यास मदत मिळणार आहे.