रत्नागिरी - राज्यातील अनेक जिल्हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच विळखा बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेले अनेक दिवस कोरोना रुग्णांची प्रतिदिन संख्या पाचशेवर स्थिर राहिली आहे. गुरुवारी ५४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. पुन्हा मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे डेल्टाचे सावट जिल्ह्यावर असल्याने प्रशासनासह आरोग्य खात्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ५९ हजार ५६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले -
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाडी-वस्तीवर तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रशासन तपासण्या वाढवून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यामध्ये प्रशासनाला अद्याप यश मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात ७ हजार २८३ तापसण्या करण्यात आला. त्यामध्ये ५४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ६ हजार ७४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत ५९ हजार ५६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी १७९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ५१ हजार १६२ रुग्ण कोरोना मुक्त झाले.