रत्नागिरी -देशातील सर्वात मोठ्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीत देखील कोरोना विरोधी लसीकरणाला सुरूवात झाली. यावेळी आमदार राजन साळवी, जि. प. बांधकाम सभापती बाबू म्हाप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, डॉ. चंद्रकांत शेरखाने आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाँ . सई धुरी यांना पहीली लस देण्यात आली. लसीचे १६ हजार ३३० डोस जिल्हा मुख्यालयाकडे उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरण -
रत्नागिरी जिल्ह्यात, जिल्हा शासकीय रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय, कामथे उपजिल्हा रुग्णालय, गुहागर ग्रामीण रुग्णालय आणि राजापूर ग्रामीण रुग्णालय अशा ५ ठिकाणी लसीकरणाला आज सुरुवात झाली. ५०० जणांना लस देण्यात येणार आहे. त्या- त्या आरोग्य संस्थेतील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. ज्यांना उच्च रक्तदाब , मधुमेह , दमा आदी दीर्घ आजार आहेत, त्यांना ही लस सध्या दिली जाणार नाही. ही लस स्नायूमध्ये दंडावर ०.५ मिली या प्रमाणात दिली जात आहे. २८ दिवसांच्या अंतराने २ डोसेस देण्यात येतील. ज्यांची नोंदणी यापूर्वी झाली आहे त्यांनाच ही लस देण्यात येत आहे. लसीकरणानंतर निरीक्षण कक्षात अर्धा तास लाभार्थ्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. घरी त्रास उद्भवल्यास जवळच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व वैद्यकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कुठलीही भिती न बाळगता सर्वांनी घ्यावी लस - डॉ. धुरी
जिल्हा रुग्णालयात मी पहिली लस घेतली याचा मला खूप आनंद होत असून, मला कुठलाच त्रास होत असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सई धुरी यांनी दिली. या लसीबाबत कोणाच्या मनात काही भिती असेल तर ती अगोदर काढून टाका, लस घेतल्यानंतर कुठलाच त्रास होत नाही. सर्वांनी मनात आत्मविश्वास निर्माण करावा आणि कुठलीही भिती न बाळगता सर्वांनी ही लस घ्यावी असे आवाहन डॉ. धुरी यांनी केले.