रत्नागिरी -जिल्ह्याची हद्द असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाटात महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांपैकी आजारी संशयित व्यक्तीची आरोग्य विभाग व प्रशासनाने कोरोना अँटिजेन/आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरच कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
रत्नागिरीच्या प्रवेशद्वारावर चाचणी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यभर 'ब्रेक द चेन' मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू नसले तरी कोरोना पसरू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आता जिल्हा प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलत तपासणी व कोरोना चाचणी वाढवण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी नसली तरी जे लोक मुंबई-गोवा महामार्गावरून जिल्ह्यात येतील त्यांच्याकडे अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे.