रत्नागिरी - बुधवारी रात्री दापोलीतील चौघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर यातील एक रुग्ण बाहेर जातो असे सांगून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दापोली तालुक्यातील बोरीवली वरचीवाडी येथील हा रुग्ण आहे. या रुग्णाचा सध्या शोध सुरु आहे.
जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 22 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये दापोली तालुक्यातील चौघांचा समावेश होता. बोरीवली येथील शाळेत 28 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातल्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णाला आणण्यासाठी रात्री रुग्णवाहिका गेली होती. मात्र, रुग्णवाहिका पोहोचण्याआधीच त्या रूग्णाने जरा बाहेर जाऊन येतो, असे सांगून पलायन केले.
रात्रीपासून या व्यक्तीला शोधण्यासाठी प्रशासन कर्मचारी, पोलीस, ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परिसरातील जंगल भागातही शोध घेण्यात आला आहे. मात्र, अद्याप हा रुग्ण प्रशासनाला सापडलेला नाही. त्याचा शोध सध्या सुरूच आहे.