रत्नागिरी - राज्यातल्या कोरोनाच्या दयनीय अवस्थेला राज्य सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच राज्य सरकार कोरोनाच्या बाबतीत निर्णय घेण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी केला आहे. आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया.... हेही वाचा...'महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी नाही तर आकड्यांशी लढतेय'
महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय कोण घेत आहे, हेच कळत नाही. मुंबईत सध्या समन्वय न साधता लोकांचा छळ आणि पिळवणूक करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. मुंबईतील लाॅकडाऊन उठवण्याची गरज नव्हती. आम्ही वेळोवेळी सांगतोय लाॅकडाऊन उठवू नका, परंतु सरकारने ऐकले नाही. आता जनतेच्या रागाचा बांध फुटायची वेळ आली आहे, असे मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे दीड ते दोन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सरकार बांधावर गेले नाहीत कि बंदरावर गेले नाहीत, असे सांगताना प्रसाद लाड यांनी कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीवरून सरकारवर निशाना साधला आहे.
राज्यात मागील तीन दिवसांपासून पाच हजारांपेक्षा जास्त संख्येने करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यात रविवारी (२८ जून) नव्या उच्चांकाची नोंद झाली आहे. राज्यात रविवारी तब्बल 5493 करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या आता 1 लाख 64 हजार 626 इतकी झाली आहे.