रायगड - कोरोनाची भीती ही नागरिकांना आहे, तशीच सरकारी सेवते काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, सेविका यांना कोरोनाच्या संसर्गाचा सर्वात जास्त धोका असल्याने त्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी आणि कोरोना होऊ नये याबाबत आपली, कुटुंबाची काळजी कशी घ्यायची, याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार डॉ. अमोल भुसारे तज्ज्ञ १६ मार्चपासून जनजागृतीचे कार्य करत आहेत. ते 'कोरोना अवेयरनेस'बाबत आपल्या टीमसोबत स्वतः भेटून तसेच वेबिनॉरद्वारे जनजागृती करीत आहेत. त्यामुळे आरोग्य, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद तसेच शासकीय यंत्रणेत काम करीत असलेले अधिकारी कर्मचारी आपली आणि आपल्या कुटुंबाचा कोरोनापासून बचाव करत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आरोग्य यंत्रणेसह सर्व शासकीय यंत्रणा कोरोनाकाळात अहोरात्र झटत आहे. असे असले तरी आपल्याला कोरोना बाधा होईल का, अशी एक अनामिक भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासकीय यंत्रणेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कोरोना अवेयरनेसबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्याचे ठरविले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांना त्यांनी याबाबत जनजागृती करण्यास सांगितले.
कोरोना अवेयरनेस उपक्रमात सहभागी झालेले पोलीस कर्मचारी त्यानुसार कोरोना जनजागृती प्रमुख डॉ. सुचिता गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विशाल दांमदोरे, यशोदा नाईक, भाग्यश्री खोत या टीमला सोबत घेऊन डॉ. भुसारे यांनी शासकीय कर्मचारी अधिकारी यांना जनजागृती करण्यास सुरुवात केली. या उपक्रमातून डॉ. भुसारे यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेतील लोकांशी सुसंवाद साधून कोरोना बाबतची भीती मनातून घालविण्यास मदत केली आहे. तसेच पोलीस, आरसीएफ कंपनीतील सीआरएसएफ, एसटी कर्मचारी, नगरपालिका या शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. जिल्ह्यातील व्यवसायिकांशी वेबिनॉरद्वारे सुसंवाद साधून त्यांनाही सहकार्य केले आहे. तर सोबतच, पॉझिटिव्ह झालेल्याचे मनोधैर्य वाढविण्याचे कामही केले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी हे कोरोनाच्या संकटातही काळजी घेऊन काम करत आहेत. डॉ. भुसारे यांच्या सहकारी असलेल्या तेजश्री पाटील प्रफुल्ल कांबळे ह्या दूरध्वनीवरून नागरिकांना माहिती देत आहेत. धनश्री कडू ह्या ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णांना, नागरिकांना माहिती देत आहेत.
नागरिकांनी अचूक माहिती असल्याशिवाय विश्वास ठेवू नका, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा असे आवाहन यानिमित्ताने डॉ. भुसारे यांनी केले आहे. कोरोनविषयी असलेली मनातील भीती या जनजागृतीमुळे कमी झाल्याने जिल्ह्यात एक शासकीय रुग्णालयातील परिचारिका सोडली तर अद्याप एकही शासकीय यंत्रणेतील कर्मचारी, अधिकारी यांना कोरोनाची लागण झालेली नाही.