रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आणखी 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा आतापर्यंत आढळून आलेला जिल्ह्यातील एका दिवसातील सर्वाधिक आकडा ठरला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 234 वर पोहोचली आहे.
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यात आणखी 26 जणांची भर पडली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्यात स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेल्या कामथे येथील 12, राजापूर 4, रत्नागिरी 6, कळंबणी 3 आणि संगमेश्वरमधील एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. चिपळूणमधील 12 पॉझिटिव्ह रुग्णांमधील 11 जण तालुक्यातील धामेली गावातील आहेत. हे सर्व मुंबईहून आलेले आहेत. चार दिवसांपूर्वी या गावात सहा रुग्ण आढळले होते. त्यामुळे या गावातील रुग्ण संख्या 17 वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 234 वर पोहोचला आहे.