रत्नागिरी- तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात जे नुकसान झालेले आहे, त्या नुकसानीबाबत मदत देताना राज्य सरकार कुठलाही भेदभाव करणार नाही. नुकसानग्रस्तांना संपूर्ण मदत मिळेल, असा विश्वास माजी विधानसभा अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ते आज(रविवारी) रत्नागिरीत बोलत होते. तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाना पटोले आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते.
तौक्ते वादळातील नुकसानीच्या भरपाईत सरकार भेदभाव करणार नाही - नाना पटोले - रत्नागिरीत नाना पटोलेचा पाहणी दौरा
नाना पटोले यांनी रत्नागिरीतील मिरकरवाडा जेट्टीला भेट देत बोटींच्या नुकसानीची पाहणी नुकसानीबाबत मच्छिमारांकडून माहिती घेतली. वादळात मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरकरवाडा येथील सुमारे 28 मच्छिमारी नौका बाधित झाल्या आहेत. या सर्व नुकसानीची पटोले यांनी माहिती घेतली.
यावेळी माजी खासदार हुसैन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले, माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, कॉंग्रेस नेते अविनाश लाड, कॉंग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, प्रदेश चिटणीस रमेश कीर, अशोकराव जाधव, राजिवडा मच्छिमार सोसायटीचे सदस्य शब्बीर भाटकर, जय हिंद मच्छिमार सोसायटीचे आयरे, कोकण विभागीय फिशरमन कॉंग्रेसचे मार्तंड नाखवा, कॉंग्रेस जिल्हा जनरल सेक्रेटरी दिपक राऊत, निसार दरवे, निसार बोरकर, करीम नाकवा, शकील दाव्त, अश्विनी आगाशे, सुश्मिता सुर्वे, रुपाली सावंत, कपिल नागवेकर आदी उपस्थित होते.
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात जिल्ह्यात आंबा उत्पादक बागायतादारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नारळी पोफळीच्या बागांनाही याचा मोठा फटका बसला आहे.या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही पाहणी दौरे केले आहेत.