रत्नागिरी -दापोली पोलीस ठाण्याच्या ( Dapoli Police Station ) इमारतीला शनिवारी (दि. 14 मे) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत पोलीस ठाण्यातील कागदपत्रांचे तसेच संगणकांचे नुकसान झाले आहे.
दापोली पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीत कागदपत्रांसह संगणकांचे नुकसान दापोली पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी गोरे, धनाजी देवकुळे, शंकर चव्हाण यांना पोलीस निरीक्षक यांच्या दालनाबाहेर असलेल्या विजेच्या मिटरजवळ आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस वसाहतीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आग लाल्याची माहिती दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पोलीस ठाण्याच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनीही तेथे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी तसेच इमारतीमधील कपाटे, कागदपत्रे बाहेर काढण्यास मदत केली.
या आगीत पोलीस निरीक्षकांच्या कक्षाबाहेर असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या रायटर यांच्या कक्षातील सर्व कागदपत्रे व संगणक जळून खाक झाले. या आगीत इमारतीमधील मुख्य भाग वाचला असून रेकोर्ड रुममधील सर्व बंदुका, कागदपत्रे, दारुगोळा वेळीच बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. खेड नगर परिषदेचाही अग्निशमन बंब दापोलीत दाखल झाला असून आग नियंत्रणात आहे. सध्या कूलिंगचे काम सुरू आहे.
या आगीमध्ये फर्निचर, वातानुकूलित यंत्रणा दस्तऐवज पोलीस निरीक्षक यांचे कक्ष पोलीस निरीक्षक यांच्या रायटरचे कक्ष, गोपनीय व पासपोर्ट कक्ष यांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच दापोलीतच असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांनी दापोली पोलीस ठाण्याला भेट दिली.
या आगीत पोलीस ठाण्यातील सीसीटीएनएस यंत्रणा बंद पडली असून पोलीस ठाण्याचे कामकाज पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या शहीद शशांक शिंदे सभागृहातून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी दिली. दापोली पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाला असून या इमारतीच्या बांधकामासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ. गर्ग यांनी सांगितले.
हेही वाचा -Konkan Hapus Mango : जीआय मानांकनामुळे हापुसला वेगळी ओळख; मात्र नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात