रत्नागिरी- नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाच्या माध्यमातून गुणात्मक वृध्दी केली, तर हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. येथे व्यवसाय निर्माण झाले तर आपली आर्थिक परिस्थिती उंचावेल आणि समाजाची उन्नती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीत नारळ लागवडीमधून रोजगार निर्मिती करणार - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित व उद्योग संचालनालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात शासकीय विभाग व उद्योजक यांच्यासाठी महाराष्ट्र काथ्या धोरण 2018 च्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
मनरेगाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवडीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. नारळ लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. नारळ लागवड केल्यानंतर काही काळ काळजी घ्यावी लागते. नारळामध्ये जवळजवळ नियमित फळधारणा होते. नारळाच्या सोडणापासून काथ्या तयार होतो. त्याच काथ्यावर आधारित मोठया प्रमाणात लघु व मध्यम उद्योग निर्माण होतात. यामाध्यमातून येथील महिलांना रोजगार निर्मीती होऊ शकेल. कोकणातील महिलांना घर बसल्या रोजगार मिळेल. महाराष्ट्र काथ्या धोरण 2018 च्या कार्यशाळेच्या माध्यमातून येथील उद्योजक, महिलांना याबाबतची माहिती होईल. तसेच महिलांना एक नवा विचार मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
कोकणाला निसर्गरम्य असा ६७० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मात्र, याठिकाणी इकोफ्रेंडली असे प्रकल्प नाही आहे. त्यामुळे येथे नारळ काथ्याच्या माध्यमातून मोठ्या उद्योगापेक्षा लघु व मध्यम उद्योग उभारून रोजगार निर्मिती करता येऊ शकेल. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात नारळाचे क्षेत्र फारच कमी आहे. नारळापासून होणाऱ्या उद्योगांना चालना देण्यासाठी ते वाढविणे गरजेचे आहे. या सर्वांचा विचार करुन शासनाने काथ्या धोरण 2018 आणले आहे. नारळापासून निघणाऱ्या काथ्यापासून दोरी, पायपुसणे इत्यादी उत्पादने घर बसल्या येथील महिला करू शकतात. त्यामधून त्यांना रोजगार मिळू शकतो, असे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार म्हणाले. यावेळी उद्योग संचालनालयाचे सहसंचालक एस. जी. रजपूत, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके, प्रकल्प संचालक माने, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. राधाकृष्णन उपस्थित होते.