रत्नागिरी -चिपळूण शहरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या नराधमाला पकडण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. अवघ्या तीन दिवसांत आरोपीला पकडल्याने चिपळूण पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
मोबाईल लोकेशनवरून शोधले
चार दिवसांपूर्वी शहरातील भोगाळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अत्याचार करणारा नराधम पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. पीडित तरुणीने वर्णन केल्याप्रमाणे एक तरुण त्यामध्ये कैद झाला होता. संबंधित तरुणाच्या हालचाली व चालण्याच्या पद्धतीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. दुसऱ्या पथकाने पीडित तरुणीचा मोबाईल व छत्री घटना स्थळावरून गायब झाल्याने त्या मोबाईलचे लोकेशन तपासले. ते लोकेशन खेड तालुक्यात आढळले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.