रत्नागिरी Chiplun Bridge Collapse : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण इथला पूल सोमवारी दुपारी कोसळल्यानं मोठी धावपळ झाली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी पूल कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं नागरिक हादरले. या प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पहाटे चार वाजता पाहणी केली. यावेळी मंत्री चव्हाण यांनी त्रिसदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल देतील, असं स्पष्ट केलं. या प्रकरणी कोणीही दोषी आढळलं, तरी कारवाई करण्यात येईल, असंही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई गोवा महामार्गावरील पूल कोसळला :मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख इथल्या गर्डरला तडा गेलेला पूल लाँचरच्या यंत्रणेसह सोमवारी दुपारी कोसळला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेची तातडीनं दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पहाटे दुर्घटनास्थळी चार वाजता भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार तसंच शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, राजेश सावंत, अनिकेत पटवर्धन आदी उपस्थित होते.
पूल कोसळल्याची दुर्घटना दुर्दैवी :सोमवारी दुपारी पूल कोसळल्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सागंतिलं. या पुलाच्या डिझाईनमध्ये काही चूक झाली होती का?, आता काम करत असताना त्याच्या बांधणीत काही चूक झाली होती, हे आता सांगणं फार कठीण आहे. पण हे कशामुळे झालं आहे याचा तपास करणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तज्ज्ञ याची चौकशी करतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यानंतरच्या काळात यामध्ये असं होऊ नये, म्हणून नक्की काय करावं लागेल, या सर्व गोष्टींसाठी पुलांच्या कामातील तज्ज्ञ त्रिसदस्यीय समिती ही दुर्घटना कशामुळे झालीय याची तपासणी करतील, असंही त्यांनी यावेळी यांनी सांगितलं. काम करत असताना अधिक काळजी घेतली जाईल. दरम्यान तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.