रत्नागिरी- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी भाजपकडून पूर्ण सज्जता झाली आहे. शहर, तालुका व जिल्हा या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर्स झळकले आहेत. यामुळे सर्वत्र भाजपमय वातावरण झाले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात करणार प्रवेश
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा आज रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहे. राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्याची भाजपकडून जय्यत तयारी कऱण्यात आली असून, राणे समर्थकांनी ठिकठिकाणी राणेंना शुभेच्छा देणारी आणि स्वागताची पोस्टर झळकवली आहेत.
केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राणे प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. आज(सोमवारी) संध्याकाळी 4. 45 वाजता जनआशिर्वाद यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होईल, त्यानंतर यात्रा खेडमधून चिपळूणकडे येईल. चिपळूणमध्ये नारायण राणे यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर मंगळवारी चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर करत ही जन आशिर्वाद यात्रा रत्नागिरीत येईल. राणे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड दीपक पटवर्धन, डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा कोकणात दाखल होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून राणे आज शिवसेनेवर कशाप्रकारे टीका करतात, नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लागले आहे. नाणार हा मोठा प्रकल्प आहे. त्याच्यासोबत राणेंच्या या मंत्री पदामुळे कोकणात लघु उद्योग उभे राहतील. पर्यावरण पूरक उद्योग इथे उभे राहिले तर इथला बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल. नाणार प्रकल्पाला असलेला शिवसेनेचा विरोधही आता कमी होत आहे. काही दिवसांपूर्वीच नाणारच्या परिसरातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रकल्पाच्या बाजूने ठरावही घेतले आहेत. शिवाय सेनेच्या विरोधाला कंटाळून अनेक शिवसैनिक भाजपात गेलेले आहेत. याचाच आता राणेंमुळे विस्तार होऊ शकतो. त्यामुळे आजच्या या जनयात्रेच्या निमित्ताने राणे नाणार आणि कोकणाच्या विकासावर काय भाष्य करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून असेल.