रत्नागिरी -संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठेतील सोनार आळीजवळील एका घरात बिबट्या जिन्याने दुसऱ्या मजल्यावर गेला. मात्र काही सावज न मिळाल्याने बिबट्या काही वेळात माघारी फिरला. रजत भाटकर यांचे हे घर आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री भाटकर यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा बिबट्या यापूर्वी घराबाहेरील परिसरात दिसून येत होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साखरपा परिसरात अनेक भागात बिबटे खुलेआम फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सीसीटीव्ही फुटेजमुळे याला दुजोरा मिळाला आहे.
बिबट्या जिन्याने गेला घराच्या दुसऱ्या मजल्यावर, नागरिकांमध्ये भीती हेही वाचा -मालवणच्या रॉक गार्डनच्या सौंदर्यात 'म्युझिकल फाउंटन'ची भर
बिबट्याचा परिसरात वावर वाढला
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. श्वानांना भक्ष्य करण्यासाठी हा बिबट्या वारंवार येथे येत आहे. गुरुवारी मध्यरात्री हा बिबट्या चक्क घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन आला. भाटकर यांच्या घरामध्ये मांजर व श्वान पाळलेले आहेत. मात्र, त्यांना घरीच सुरक्षित बंदिस्त करून ठेवण्यात येते. भाटकर यांच्या घराबाहेर जिना आहे. या जिन्याने बिबट्याने दुसऱ्या मजल्यावर कानोसा घेत प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे .
पाळीव प्राण्यांचा मागोवा घेत बिबट्याचा घरात शिरण्याचा प्रयत्न
या घटनेमुळे भाटकर यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याजवळ असणाऱ्या पाळीव प्राण्यांचा मागोवा घेत हा बिबट्या येथे येत असल्याचा अंदाज होता. तो अखेर खरा ठरला. वन विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी साखरपा परिसरामध्ये होत आहे. बिबट्या थेट घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागल्याने वन विभागाने ही घटना गांभीर्याने घेऊन याबाबत हालचाल करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत भाटकर स्वतःही वन विभागाकडे तक्रार करणार आहेत.
हेही वाचा -'हॅप्पी इंडियन व्हिलेज'चा उपक्रम : एचआयव्हीबाधित अनाथ मुले आत्मनिर्भर, सेवालयात फुलली शेती