रत्नागिरी- कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या राजीवडा भागात कंटेंटमेंट आणि बफरझोन जाहीर केला होता. मात्र,राजीवडा खाडी किनारी भागात मासेमारी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कंटेंटमेंट झोन असतानाही राजीवडा खाडीकिनारी मासेमारी, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
कंटेंटमेंट झोन असतानाही राजीवडा खाडीकिनारी मासेमारी होता आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने राजीवडाच्या तीन किलोमीटर परिसरात कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला होता.
राजीवडा परिसरात मरकझवरून आलेला रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह सापडला होता. या रुग्णाचे वास्तव्य राजीवडा भागात होते. त्यामुळे राजीवडा परिसर कंटेंटमेंट आणि बफर झोन जाहीर केला होता. या नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते.
याप्रकरणी नौका चालकांसह सहा जणांविरोधात रत्नागिरीच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३, ४ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. मत्स्य परवाना अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.