महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूणमधील 'त्या' तरुणांचा अपघाती मृत्यू; चक्काचूर कारसह कुजलेले मृतदेह आढळले दरीत - Ratnagiri accident news

पुण्याला जात असतांना बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचा मृतदेह खोल दरीत आढळला. वीस दिवसांपूर्वी सातारा चिपळूण मार्गावरील उरुल घाटात कारचा अपघात झाला होता.

अपघातात मृत्यू झालेला तरूण
अपघातात मृत्यू झालेला तरूण

By

Published : Sep 28, 2020, 4:08 PM IST

रत्नागिरी -वीस दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांंचे मृतदेह चिपळूण सातारा मार्गावरील उरुल (ता. पाटण) येथील घाटातील खोल दरीत आढळला. त्यासोबत दरीत कोसळलेली कार देखील सापडली. त्यामुळे या तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अक्षय कुंभार आणि अजिंक्य मोहिते (रा. पिंपळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हे दोघे वीस दिवसांपूर्वी होंडा सिटी कारने (एम. एच. 04 एच. एन. 4388) पुण्याकडे निघाले होते. पाटण-उंब्रज-सातारामार्गे ते पुण्याला जाणार होते. परंतु, त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे कारसह दोन तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी शिरगाव-अलोरे पोलीस ठाण्यात दिली होती. मागील आठवड्यात मल्हारपेठ पोलिसांना पाटण-उंब्रज मार्गावरील उरूल घाटात एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याआधारे पोलिसांनी आजुबाजूच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मल्हारपेठ पोलिसांनी चौकशी केली असता, दोन तरुण बेपत्ता झाल्याची नोंद शिरगाव-अलोरे पोलीस ठाण्यात असल्याची माहिती मिळाली.
एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने त्यांच्या कारचा घाटात अपघात झाला असावा, या शक्यतेने पोलिसांनी उरूल घाटातील खोल दरीत शोध घेतला. त्याठिकाणी अपघातग्रस्त कार आणि कारपासून काही अंतरावर आणखी एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहांची ओळख पटत नव्हती. त्यामुळे बेपत्ता युवकांच्या नातेवाइकांना बोलावून घेतल्यानंतर त्या मृतदेहांची ओळख पटली.
पोलिसांनी आरोग्य अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून त्याचठिकाणी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उरूल घाटातील धोकादायक वळणावर संरक्षक कठडे नाहीत. तेथूनच कार खोल दरीत कोसळली असावी, असा अंदाज मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details