रत्नागिरी- नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रभारी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी माजी नगराध्यक्ष तथा शहर विकास आघाडीचे उमेदवार मिलिंद किर यांच्यावर काही कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, मिलिंद किर यांनी हे आरोप खोडून काढत बंड्या साळवी यांच्यावर पलटवार केला आहे.
नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक जाहीर; उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप हेही वाचा -एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला, भाजपमध्ये नाराजी सत्र सुरूच
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मिलिंद किर म्हणाले की, परटवणे पुलाचं काम अपूर्ण आहे, ते मिलिंद किर यांनी का केलं नाही असा बंड्या साळवी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, मी नगराध्यक्ष असताना या कामासाठी जेवढी निधीची तरतूद होते, तेवढे काम झाले. 43 लाखांचे ते काम होते. उर्वरीत कामासाठी साठ लाख अंदाजपत्रक करण्यात आले होते. मात्र, माझा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर या कामामध्ये पुढे काहीच झाले नाही. मात्र, गेली अडीच वर्षे शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे, बंडया साळवी यांनी नगराध्यक्षांना कुठली कामं अर्धवट आहेत, कुठल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे हे सांगितलं असतं तर ती कामं झाली असती. मात्र, बंड्या साळवी यांनी तत्कालीन नगराध्यक्ष राहुल पंडित यांना कुठलं कामच करू दिलं नाही, असा आपला आरोप असल्याचे मिलिंद किर यावेळी म्हणाले. यामुळेच या नगर परिषदेचा खेळखंडोबा झाला असून जनतेच्या मताचा अनादर झाला आहे. त्यामुळे जनताच आता ठरवेल कुठला उमेदवार स्वीकारायचा ते, असंही किर यावेळी म्हणाले.
दरम्यान, गेल्या नऊ महिन्यात बंड्या साळवी यांनी काय विकास केला. खड्डे बुजवणे हाच विकास आहे का? इतर कामे का झाली नाहीत. शासनाकडे प्रस्ताव पाठवले असते तर निधी मिळाला असता, असा पलटवार मिलिंद किर यांनी केला आहे.