महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत कृषी विभागाकडून बोगस खत कारखाना उद्ध्वस्त; साडेसहा हजार खताची पोती जप्त - रत्नागिरी

सेंद्रिय खताच्या नावाखाली जिल्ह्यात बोगस खताची विक्री सुरू झाली आहे. रत्नागिरीतील  मिरजोळे एमआयडीसीतील बोगस खत तयार करणारा कारखाना जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज उद्ध्वस्त केला आहे.

रत्नागिरीत कारखाना कृषी विभागाकडून उद्ध्वस्त

By

Published : Jun 19, 2019, 11:39 PM IST

रत्नागिरी- कोकणात सध्या शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरीवर्ग खत खरेदीच्या कामात गुंतला आहे. मात्र, याच संधीचा फायदा उठवत सेंद्रिय खताच्या नावाखाली जिल्ह्यात बोगस खताची विक्री सुरू झाली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीतील बोगस खत तयार करणारा कारखाना जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज उद्ध्वस्त केला आहे.

यावेळी सुमारे चाळीस लाख किंमतीची साडेसहा हजार खताची पोती जप्त करण्यात आली आहेत. तर या कारखान्याला सील करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आरीफ शाह यांनी सांगितले. या धडक कारवाईमुळे बनावट खत विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अरिफ शाह, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांची प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत भरारी पथकाद्वारे खताची तपासणी सुरू आहे. मंगळवारी राजापूर तालुक्यातील कशेळी येथे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जी. आर. मुरकुटे यांनी केलेल्या तपासणीत बोगस सेंद्रीय असल्याचे आढळले होते. बोगस खत नेमके आले कुठून याचा तपास सुरू असताना मिरजोळे एमआयडीसीतील अँम्बीशस फिशमिलमध्ये बोगस खताचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले होते.

बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आरिफ शाह, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक जी. आर. मुरकुटे यांच्यासह सुमारे दहा कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने कारखान्यावर धाड टाकली. हा कारखाना सिराज काझी यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातून सुमारे सात ते आठ ट्रकांमधून खताची विक्री यापूर्वी करण्यात आली आहे. सिराज काझी यांच्याकडे खतनिर्मितीचा कोणताही परवाना नाही. असे असताना खत निर्मितीकरून शेतकऱ्यांची फसवणुक केली जात होती. तसेच कारखान्यात असलेल्या एकूण मालाचे रजिस्टर उपलब्ध नाही.


अशी होते बोगस खताची निर्मिती

मच्छी कुजवून त्यामध्ये सोयाबीन टाकून सेंद्रीय खत तयार केले जाते. शंभर टक्के विघटनशील सेंद्रीय खत म्हणून प्रोटीनयुक्त सुपिका या नावाने खताची विक्री केली जात आहे. सुमारे चाळीस किलो वजनाचे पोते ५५० रुपयांना विक्री केले जात आहे. याच ठिकाणी सन २००६ ते ०९ पर्यंत सीटी कंपोस्ट खताची निर्मिती केली जात होती. सन २००९ मध्ये परवाना संपल्यानंतर सिराज काझी यांनी खतनिर्मितीचा कोणताही परवाना शासनाकडून घेतलेला नाही.

कारखान्यात सुमारे आठ ते नऊ कामगार आहेत. आतमध्ये तीन टाक्या असून त्यामध्ये खतासाठी आवश्यक कच्चा माल कुजवला जातो. हा प्रकार उघड झाल्यानंतर तात्काळ सिराज काझी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोन तासात नोटीसीचा खुलासा करा, असे आदेश आरिफ शाह यांनी दिले आहेत. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली आहे. कृषी विभागाचा पंचनामा पुर्ण झाल्यानंतर रितसर तक्रार करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details