रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सालदूरे मुरुड समुद्रकिनारी बुधवारी सकाळी ब्लू व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळून आला. दहा ते बारा दिवसांपूर्वी समुद्रात त्याचा मृत्यू होऊन तो लाटांमुळे वाहत समुद्रकिनारी आला असावा, असा अंदाज आहे.
मृत मासा समुद्रकिनारी आला असल्याचे समजताच हा ब्लू व्हेल मासा पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. साधारण ५७ फूट लांबीचा हा ब्लू व्हेल मासा असून याचा सुमारे पंधरा दिवसांपूर्वी समुद्रात मृत्यू झाला असावा, अशी माहिती प्राणी तज्ज्ञ अभिनय केळस्कर यांनी दिली. मोठ्या जहाजाला आपटून किंवा प्रदूषणामुळे अथवा आपल्या कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे, अशा माशांचा मृत्यू ओढवतो, असेही त्यांनी सांगितले.